तळोदा महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील गोसावी यांना संशोधक म्हणून जागतिक मानांकन
तळोदा : अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स हि वैज्ञानिक कार्यक्षमता आणि वैज्ञानिकांच्या वैयक्तिक संशोधन मूल्यावर आधारित विश्लेषण प्रणाली विकसित केलेली आहे. जगभरातील १९४ देशातील ११६३९ विद्यापीठातील ७ लाख ६ हजार ४७५ संशोधकांमधून करण्यात आलेल्या निवडीत तळोदा महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील गोसावी यांनी स्थान पटकाविले आहे.
प्रा.डॉ.सुनील गोसावी तळोदा महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख असून त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने भौतिकशास्त्र या विषयासाठी पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. प्रा.डॉ.सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ४ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांमध्ये पीएच.डी. प्राप्त केलेली आहे तसेच ४ विद्यार्थी पीएच.डी.साठी कार्यरत आहेत. तसेच डॉ. गोसावी यांचे आत्तापर्यंत ३५ संशोधनपर लेख विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले असून त्यांनी जवळपास ४० पाठ्यपुस्तकांचे लिखाण केलेले आहे. २०१५ साली डॉ. गोसावी यांनी थिन-फिल्म सेन्सोर या विषयावर जर्मनीतून एक पुस्तक प्रकाशित केले आहे.
तळोद्या सारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लागावा म्हणून डॉ.गोसावी यांनी महाविद्यालयात यापूर्वीच राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन तसेच “अविष्कार” या वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. तळोदा महाविद्यालयात विज्ञान विषयाचे संशोधन केंद्रे स्थापन करण्यासाठी माजी प्राचार्य डॉ. पी.व्ही. रामैया आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या सहकार्याने डॉ. सुनील गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयात संशोधन केंद्रे स्थापन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील, प्र. कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील व तसेच अधिष्ठाता प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.
डॉ.सुनील गोसावी यांना आल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स मध्ये भारतातून १९ हजार ७७५ वे मानांकन मिळालेले आहे. डॉ.गोसावी यांच्या यशाबद्दल महाविद्यालय कार्यकारिणी अध्यक्ष, महाविद्यालय व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
0 Response to "तळोदा महाविद्यालयातील प्रा.डॉ.सुनील गोसावी यांना संशोधक म्हणून जागतिक मानांकन"
टिप्पणी पोस्ट करा