तळोदा शिवारात सिंह पाहिल्याचा शेतकऱ्याचा दावा ; ठसे पाहून वनविभाग ही अवाक् !!! शक्यता नाकारली नाही..
तळोदा : शिवारात उमाकांत शेंडे यांच्या शेतात एकाच दिवसात सिंह व नर मादी बिबट यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच दिवसात 2 हिंस्त्र प्राण्यांच्या दर्शनाने घबराट पसरली आहे तर चक्क सिंहाचा वावर परिसरात असल्याचा दावा दोघा शेतकऱ्यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याच्या पायाच्या ठश्या पेक्षा मोठ्या आकाराचे ठसे दिसून आल्याने वनविभागाने देखील बुचकळ्यात पडला आहे. पुढील तपासासाठी व खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल रोडे यांनी सांगितले.
याबाबत अधिकवृत्त असे की, तळोदा शिवारातील उमाकांत वसंत शेंडे व त्यांचे बंधू शशिकांत वसंत शेंडे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी शेतात फेर फटका मारण्यासाठी गेले असता पहाटे 6 वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावर सिंह बसला असल्याचे त्यांना त्यांचे रखवालदार रमेश पाडवी यांच्या मुलीने सांगितले. दरम्यान काही अंतरावर जाऊन पाहिले असता त्यांना त्याठिकाणी सिंह बसलेला असल्याचे लक्षात आले. त्यांनी पुढे न जाता त्यावर नजर ठेवून त्याच्या हलचालीकडे लक्ष ठेवले, दरम्यान काही अवधींनंतर सिंह तिथून निघून गेला. त्यानंतर काही क्षणातच थोडे पुढे गेल्यावर बिबट नर व मादीचे जोडपे एका झाडावरून उतरताना त्यांना दिसले. अवघ्या काही क्षणात सिंह व बिबट्याचे दर्शन झाल्याने भयभीत अवस्थेत त्यां दोघांनी घर गाठले व आपल्या मुलांच्या माध्यमातून सदर घटना तात्काळ वनविभागाला कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता क्षणाचा विलंब न करता वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनरक्षक विरसिंग पावरा, गिरधर पावरा, वासुदेव माळी यांच्यासह कैलास शेंडे, शिवम शेंडे, सचेत शेंडे, तिरथ शेंडे, कुशल सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी आदींनी जाऊन पाहणी केली व ठस्याचे नमुने घेतले. दरम्यान झाडावर बिबट्याचे नख्यांचे ठसे व ठिकठिकाणी पायांचे ठसे आढळून आले. तर बांधाजवळ ठसे पाहिले असते ते आकाराने मोठे आढळून आल्याने वनविभागाचे कर्मचारी देखील बुचकळ्यात पडले.
शेतामध्ये बिबट्याचा व सिंहाचा वावर असल्याचे कळताच परिसरात घबराट पसरली. शेतांमध्ये भीतीने मजूर जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जिवाची भीती असल्याने खुद्द शेतमालकानाही शेत कामे करण्यासाठी जाता येत नसल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गस्त घालण्यासाठी पथक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र पिंजरा लावण्यासाठी वन विभागाचे स्वतंत्र निकष आहेत. जिल्हा स्तरावरून परवानगी मिळाल्याशिवाय पिंजरा लावता येत नाही. याबाबत वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात ट्रॅप कॅमेरा लावणार असून सकाळी व सायंकाळी गस्त घालण्यासाठी पथकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी सांगितले.
मात्र या उपाययोजना तोकड्या असून शेतकऱ्यांना जीवाची हमी देण्यात वनविभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया या भागातील शेतमालकांनी दिली. जीवाची जोखीम घेऊन शेतांमध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली...
चौकट***
मागील शनिवारी 4 सप्टेंबर रोजी तळोदा शहराच्या वेशीवर बिबट्याचे दर्शन झाले होते. बुधवारी देखील पालिकेचे कर्मचारी विजय सौंदाने यांना शहादा रस्त्यावरील ओपन जिम परिसरात बिबट्या बसलेला दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. आठवडा उलटला नाही तोवर अगदी लोकवस्ती हाकेच्या अंतरावर असलेल्या तळोदा शेतशिवारात चक्क सिंहाचा वावराचा चर्चेमुळे प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर प्राणी हे एकाच ठिकाणी राहत नसून जागा बदलत असतात त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही कुठेही प्राणी आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
प्रतिक्रिया ***
बिबटच्या पंज्याच्या आकारापेक्षा मोठ्या आकाराचा पंजे दिसून येत असल्याने बिबट शिवाय इतर दुसरा प्राणी असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पुढील तपासासाठी व खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत त्या नंतरच खरे चित्र स्पष्ट होईल ..
निलेश रोडे
वनक्षेत्रपाल वनविभाग तळोदा
प्रतिक्रिया***
शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलो असता सिंह साधारणतः 100 फूट अंतरावर असलेल्या बांधावर बसून होता. दरम्यान त्याची जाण्याची वाट पाहिली तो तेथून निघून गेल्यावर पुढे जाण्यासाठी निघालो असता काही क्षणातच अचानक लिंबाचा झाडावरून बिबट्याचे जोडपे खाली उतरले व डरकाळ्या फोडून भांडु लागले. सदर प्रसंग हा खूपच थरारक होता. आम्ही दोघे खूपच घाबरलो होतो.
शशिकांत शेंडे
शेतकरी
0 Response to "तळोदा शिवारात सिंह पाहिल्याचा शेतकऱ्याचा दावा ; ठसे पाहून वनविभाग ही अवाक् !!! शक्यता नाकारली नाही.."
टिप्पणी पोस्ट करा