संपर्क करा

पत्रकाराला धमकी प्रकरणी निषेध; दोषींवर कारवाई व डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी

पत्रकाराला धमकी प्रकरणी निषेध; दोषींवर कारवाई व डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजेरी आणि अनास्थेवरील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित पत्रकाराला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करत बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले.

                     संघटनेने आपल्या निवेदनात, संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची तसेच धमकी देणाऱ्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदा २०१७ व २०१९ अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संबंधित पत्रकार, जुगनी गाव शाखेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             संघटनेच्या म्हणण्यानुसार, दिनांक १६ जुलै २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थितीवर आधारित बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याचा राग मनात धरून १९ जुलै रोजी रात्री उशिरा संबंधित पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना धडगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी घडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

             याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकाराचा निषेध करताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील अन्याय व अनियमितता याविरोधात आवाज उठवण्याचे कार्य ते करतात. त्यामुळे पत्रकाराला दिलेली धमकी ही संपूर्ण समाजासाठी धोका निर्माण करणारी आहे. अशा धमक्या व दडपशाहीच्या प्रकारांना आम्ही कदापी सहन करणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले..



0 Response to "पत्रकाराला धमकी प्रकरणी निषेध; दोषींवर कारवाई व डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article