श्री दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड सप्ताहाचे आयोजन
तळोदा : शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा (दिंडोरी प्रणित) केंद्रात दि. 9 डिसेंबरपासून श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप, यज्ञ, याग व सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान सात दिवस चालणार असून 24 तास अखंड सेवा केली जाणार आहे.
या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ मंत्रजप, चरित्र वाचन, विविध पारायण, विना वादन नामस्मरण, तसेच हवन आणि यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवेमुळे जीवनातील दुःख, संकटे, आजार दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहाचे मुख्य कार्यक्रम:
8 डिसेंबर: ग्रामदेवता निमंत्रण व मंडळ मांडणी
9 डिसेंबर: मंडळ स्थापना व अग्निस्थापना
10 डिसेंबर: श्री गणेश याग व श्री मनोबोध याग
11 डिसेंबर: श्री गीताई याग
12 डिसेंबर: श्री स्वामी याग
13-14 डिसेंबर: श्री चंडी व मल्हारी याग
15 डिसेंबर: बलीप्रदान, पूर्णाहुती व दत्त जन्म उत्सव (दुपारी 12:39)
16 डिसेंबर: सत्यदत्त पूजन व महाआरती, महाप्रसाद
यासोबतच सामुदायिक सेवा, गुरुचरित्र वाचन, भागवत पारायण, श्री दुर्गासप्तशती पाठ यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होईल. याशिवाय दर गुरुवार आणि रविवारी केंद्रात प्रश्नोत्तर सेवा आयोजित केली जाते. शहर व परिसरातील भाविकांनी या पवित्र सप्ताहात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे व जीवनात सकारात्मक बदल अनुभवावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Response to "श्री दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड सप्ताहाचे आयोजन"
टिप्पणी पोस्ट करा