तळोदा-शहादा विधानसभा निवडणूक : काँग्रेसचा बालेकिल्ला आणि भाजपची रणनीती ; कोण मारणार बाजी? उमेदवारांचे भविष्य मतपेटीत कैद...
तळोदा : शहादा विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघातून तब्बल 45 हजार मतांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे काँग्रेसचे वातावरण सुरुवातीपासूनच अनुकूल होते. याच यशामुळे काँग्रेसच्या तिकीटासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने भाजपातून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली, ज्यामुळे काही कार्यकर्त्यांनी बंड पुकारले होते. प्रारंभी भाजपचा प्रभाव मर्यादित वाटत असला तरी पक्षाच्या नेतृत्त्वाखालील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे नेमकी बाजू कोण मारणार हे उत्सुकतेच ठरणार आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने बंडखोरी थंड करण्यात काँग्रेसला यश मिळाले. ऐन प्रचाराच्या काळात सर्वजण एकत्र येत, भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. सुरुवातीला काँग्रेसला एकतर्फी आघाडी वाटत होती. मात्र, भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांनी आपला जनसंपर्क आणि कार्यक्रमांमध्ये सतत उपस्थित राहून आपले स्थान भक्कम केले.
राजेश पाडवी यांच्या वडील उदेसिंग पाडवी यांच्यातील वाद मिटल्याने दोघांनी एकत्र प्रचाराला सुरुवात केली. यामुळे भाजपाने आपली ताकद वाढवली. भाजपने ग्रामीण आणि शहरी भागात प्रभावी प्रचार करत मतदारांवर चांगला परिणाम साधला आहे. आता ही निवडणूक काँग्रेसच्या गडासाठीचा संघर्ष आणि भाजपाचा वाढता प्रभाव यामधील थेट लढत ठरू शकते.
आमदार राजेश पाडवी यांना स्वतःची वेगळी ओळख असून, त्यांच्या लावकिच्या स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने पक्षाच्या उमेदवाराला मतदारांचा मजबूत पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राजेश पाडवी यांच्या व्यक्तिगत कार्यामुळे भाजपही चांगली कामगिरी करू शकते, असा अंदाज वर्तवला जातो आहे. ही निवडणूक तळोदा-शहादा क्षेत्रातील भविष्यातील राजकीय समीकरणे ठरविणारी ठरू शकते.
राजेश पाडवी यांनी मतदारसंघात सतत जनसंपर्क आणि स्थानिक स्तरावर उपस्थिती राखली आहे. त्यांचे वडील उदेसिंग पाडवी यांच्यासोबतचा वाद संपुष्टात आल्याने, प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. पाडवी यांचा लावकिचा स्वभाव, छोट्या-मोठ्या प्रश्नांवर लोकांना दिलेले सहकार्य, आणि ग्रामीण भागातील ताकदवान कामगिरी यामुळे त्यांची प्रतिमा मजबूत झाली आहे.
बुधवारी सकाळी पासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, मतपेटीत उमेदवारांचे भविष्य बंद होणार आहे. मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहील, याबाबत सध्या प्रचंड उत्सुकता आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रत्यक्ष मतदार संपर्क, प्रचाराची रणनीती, आणि मतदारांना दिलेले आश्वासन यावर निकालाचे गणित अवलंबून आहे.
सदर निवडणूक केवळ पक्षीय शक्तीची चाचणी नसून, आमदार राजेश पाडवी आणि काँग्रेसच्या परंपरेतील थेट संघर्ष ठरणार आहे. निकाल हा मतदारांच्या प्राधान्यानुसार दोघांपैकी कोणाला बाजी मिळवून देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल...
0 Response to "तळोदा-शहादा विधानसभा निवडणूक : काँग्रेसचा बालेकिल्ला आणि भाजपची रणनीती ; कोण मारणार बाजी? उमेदवारांचे भविष्य मतपेटीत कैद..."
टिप्पणी पोस्ट करा