तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे
तळोदा : तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. या सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीला संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दीपक मराठे, नारायण जाधव, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी पत्रकार उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचा हिशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संघाच्या माध्यमातून गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव तसेच पेपर विक्रेते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविले जातात.नवीन कार्यकारिणीने आगामी काळात संघटन अधिक मजबूत करून पत्रकार हिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. नूतन पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Response to "तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे"
टिप्पणी पोस्ट करा