के. आर. पब्लिक स्कूलच्या रेनबो प्लेग्रुप व शिशुकुंज विभागाचा वार्षिक महोत्सव उत्साहात संपन्न
तळोदा : श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथील रेनबो प्लेग्रुप व शिशुकुंज विभागाचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक अशोक शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चेअरमन किशोर वाणी लाभले होते. तसेच नंदुरबार शहराचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, व्हा. चेअरमन सिद्धार्थ वाणी, संचालिका केतकी वाणी आणि प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या वार्षिक महोत्सवात सुमारे 300 चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध नृत्यप्रकार, गीत, नाट्यछटा व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
बालकलाकारांच्या मनमोहक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांच्या उत्साही व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी शाळेत नियमितपणे विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात चेअरमन श्री किशोरभाई वाणी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा वार्षिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, प्रेरणादायी व स्मरणीय ठरला.
0 Response to "के. आर. पब्लिक स्कूलच्या रेनबो प्लेग्रुप व शिशुकुंज विभागाचा वार्षिक महोत्सव उत्साहात संपन्न"
टिप्पणी पोस्ट करा