रांझनी आश्रमशाळेत वृक्ष दिंडी व वृक्षारोपण उत्साहात संपन्न
तळोदा– श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे युवा संचालक आदित्य मालपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रांझनी येथील आश्रमशाळेत वृक्ष दिंडी व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्षांची पालखी सजवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. "वृक्ष वाचवा – पर्यावरण वाचवा", "झाडे लावा – जीवन जगवा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीनंतर शाळेजवळील मोकळ्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्याध्यापक भाऊसाहेब कुवर यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, हवामान बदलावर होणारे परिणाम आणि जलसंवर्धनासंदर्भातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन केले. वृक्षारोपण समितीचे अध्यक्ष रामकृष्ण शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वृक्षलागवडीचे फायदे, काळाची गरज आणि वृक्षसंवर्धनाचे सामाजिक भान स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकजुटीने मेहनत घेतली. या उपक्रमाचे औचित्य युवा संचालक आदित्य मालपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह व प्रेरणा मिळाली.
0 Response to "रांझनी आश्रमशाळेत वृक्ष दिंडी व वृक्षारोपण उत्साहात संपन्न"
टिप्पणी पोस्ट करा