"सेवाभावी आयुष्याचा अंत – स्व. अनुपचंद गोदुलालजी जैन यांना श्रद्धांजली"
प्रेम, सेवा आणि सादगीचा दीप मालवला"
शनिवार, ७ जून २०२५ रोजी सकाळच्या सुमारास, तळोदा नगरीतील एक सुसंस्कृत, करुणामयी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपले –स्व. अनुपचंद गोदुलालजी सेठीया जैन यांचे वयाच्या ९०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर समाजाच्याही हृदयात एक शून्यता निर्माण झाली आहे. त्यांनी ज्या प्रकारे आपले संपूर्ण जीवन समाजसेवेला समर्पित केले, त्यातून एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला होता.
अनुपचंदजींचा जीवनप्रवास हा सुसंस्कारिततेचा, कष्टप्रियतेचा आणि करुणेचा संगम होता. प्राणीमात्रांप्रती असलेले त्यांचे प्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास ओळख होती. दररोज सकाळी शतपावलीसाठी बाहेर पडताना ते रस्त्यावरील उपाशी प्राण्यांसाठी चपात्या आणि गुरांसाठी चारा घेऊन जात असत. कुठे एखादा भुकेने व्याकुळ झालेला कुत्रा दिसला, तर ते थांबून त्याला अन्न देत. त्यांच्यातील ही सहवेदना आणि करुणा प्रत्येक कृतीतून प्रकट होत असे. गरजू, आजारी, दुर्बल व्यक्तींना मदत करणे हे त्यांचे जीवनध्येयच होते. कोणीही मदतीसाठी त्यांच्या दारात आलं की त्यांनी कधीही नकार दिला नाही. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी त्यांची विशेष तळमळ होती लांबून येणाऱ्या भाविकांच्या सेवासाठी ते तत्पर उभे राहत असत. कपडे, औषधे, अन्न, किंवा आवश्यक ती आर्थिक मदत – ते सर्व काही शक्य तितक्या शांत आणि निःस्वार्थ भावनेने करत असत. त्यांच्यासाठी समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नव्हती, तर तीच त्यांच्या जीवनाची दिशा होती. त्यांनी निस्वार्थ भावनेने अनेकांचे आयुष्य उजळवले.
ते तळोदा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि साधा पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष गौतम जैन, गुलराज जैन, चंपालाल जैन, संतोष सेठ जैन, राजेंद्र जैन,सुभाष जैन यांचे वडील होत. आपल्या मुलांना त्यांनी जे जीवनमूल्य, सद्विचार आणि सामाजिक जाण दिली, ती आज त्यांचं खऱ्या अर्थाने प्रेरणादायी वारसत्व ठरत आहे. “प्रेम हीच खरी संपत्ती असते, आणि अनुपचंदजींनी ती संपत्ती भरभरून वाटली” – या शब्दांतच त्यांच्या जीवनाचा सारांश सामावतो. त्यांच्या जाण्याने समाजातील एक अन्नदाता, एक प्रेमळ पिता, आणि एक सज्जन नागरिक हरपला आहे. तळोदा येथील त्यांचे निधन आज दुपारी २:३० वाजता झाले असून, अंतिम यात्रा आज, ७ जून रोजी संध्याकाळी ६:०० वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानाहून निघेल.
सेठिया कुटुंबियातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व समाजातून गेले, परंतु त्यांच्या आठवणींनी समाजात त्यांच्या कार्याची अमिट छाप कायम राहील. त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली....
सुधाकर मराठे
9595008844
0 Response to ""सेवाभावी आयुष्याचा अंत – स्व. अनुपचंद गोदुलालजी जैन यांना श्रद्धांजली""
टिप्पणी पोस्ट करा