नंदुरबार जिल्ह्यात ड्रोन वापरावर बंदी : "नो फ्लाय झोन" जाहीर
तळोदा : भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) (३) नुसार नंदुरबार जिल्ह्यात "नो फ्लाय झोन" घोषीत केला आहे.
या आदेशानुसार, ९ मे २०२५ च्या रात्री १२:०१ वाजल्यापासून ते ३१ मे २०२५ च्या रात्री १२:०० वाजेपर्यंत कोणताही व्यक्ती विना परवाना व बेकायदेशीररित्या ड्रोन उडवू शकणार नाही. तसेच, ड्रोनद्वारे छायाचित्रण देखील पोलीस विभागाच्या परवानगी शिवाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी आवश्यक आहे. सर्व ड्रोन चालक व मालकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांमार्फत देण्यात आले आहेत.
0 Response to "नंदुरबार जिल्ह्यात ड्रोन वापरावर बंदी : "नो फ्लाय झोन" जाहीर"
टिप्पणी पोस्ट करा