तळोदा यात्रा अपयशी; पावसासह पालिकेच्या अकार्यक्षम नियोजनामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान
तळोदा — अक्षय तृतीया निमित्त दरवर्षी मोठ्या जल्लोषात भरवली जाणारी तळोद्याची पारंपरिक यात्रा यंदा पावसामुळेच नव्हे, तर नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळेही अपयशी ठरली. या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना, पाळणेवाल्यांना आणि यात्रेकरूंना यंदा विविध अडचणींचा सामना करावा लागला.
पूर्वी संपूर्ण महिनाभर चालणारी ही यात्रा मागील काही वर्षांपासून आठवडाभरापुरती मर्यादित झाली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे सुरुवातीचा दिवसातच यात्रा विस्कळीत झाली. परंतु केवळ निसर्ग नव्हे, तर स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेही यंदाची यात्रा निरुत्साही ठरली.
यात्रेसाठी निश्चित केलेली जागा अत्यंत अपुरी आणि असुविधायुक्त होती. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य झाले असून, बसण्याची व राहण्याची योग्य व्यवस्था नव्हती. पाळणे व खेळणी लावणाऱ्या व्यावसायिकांसाठी वीज, पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. काही स्टॉलधारकांचे साहित्य पावसात भिजून खराब झाले.
पालिकेने पुरेशी जागा उपलब्ध करून दिली नाही, तसेच पावसाचा पूर्वानुमान लक्षात घेऊन कोणतेही पर्यायी व्यवस्था केलेली नव्हती. परिणामी, यात्रेत आलेल्या भाविकांना आणि व्यावसायिकांना गैरसोयींचा मोठा फटका बसला.
ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर स्थानिक अर्थकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पुढील वर्षी अशा प्रकारचा अनुभव पुन्हा येऊ नये, यासाठी नगरपालिकेने योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे..
0 Response to "तळोदा यात्रा अपयशी; पावसासह पालिकेच्या अकार्यक्षम नियोजनामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान"
टिप्पणी पोस्ट करा