अलिविहिर आश्रमशाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, परिसरात खळबळ
तळोदा : प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहिर येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दुसरीतील विद्यार्थिनी तमन्ना बाज्या वसावे (वय ८, रा. उमरागव्हाण) हिचा मृत्यू गुरुवारी सकाळी झाला. या घटनेमुळे शाळा आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास तमन्ना प्रार्थनेला आली नसल्याचे लक्षात येताच शाळेतील स्वयंपाकी रिजवाना वसावे हिने मुलींच्या वसतिगृहात तिची चौकशी केली. त्यावेळी ती झोपेतच होती, मात्र कोणतीही हालचाल नव्हती. तातडीने शाळा प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तिला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
बुधवारी संध्याकाळी तमन्ना नेहमीप्रमाणे प्रार्थनेत सहभागी झाली होती आणि रात्री जेवण केल्यानंतर झोपली होती. तिच्या मैत्रिणींनी सांगितले की, मध्यरात्री ती बाथरूमला गेली होती. मात्र सकाळी प्रार्थनेसाठी उठवण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती. मुख्याध्यापक रजेवर होते. त्यांनी सांगितले की, तमन्ना रात्रीपर्यंत व्यवस्थित होती. सकाळी तिच्या हालचाली दिसल्या नाहीत म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
तळोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र पवार तपास करत आहेत. या घटनेमुळे शाळेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पालक आणि शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून तमन्नाच्या मृत्यूमागील सत्य समोर येण्यासाठी परिसरातील नागरिक योग्य तपासाची मागणी करत आहेत.
0 Response to "अलिविहिर आश्रमशाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, परिसरात खळबळ"
टिप्पणी पोस्ट करा