राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांचा राजीनामा, भाजपाशी संपर्क असल्याची चर्चा
28 नोव्हेंबर 2024:
तळोदा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द केला आहे. हा राजीनामा त्यांनी वैयक्तिक कारणे देत दिला असला, तरी निवडणुकीतील पक्षाच्या अपयशामुळे त्यांच्या निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आले. या पराभवानंतर मराठे यांच्यावर कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात दबाव वाढला. मराठे यांनी आपली जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
मराठे यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती पक्षाचे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते तथा पक्षाचे निरीक्षक आम.सुनिल भुसारा यांना कळवली आहे. पक्षाने त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केल्याचे समजते.
भाजपाशी संपर्काची चर्चा
राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर, मराठे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा तळोद्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षांतराचे शक्यता सध्या अस्पष्ट असली तरी, त्यांच्या आगामी निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की “मी राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला आहे. भविष्याचा दृष्टीने कार्यकर्त्यांच्या हिताच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय लवकरच घेईन. पक्षासाठी कार्यरत राहण्याची माझी भूमिका कायम आहे. मात्र पक्ष कुठला हे विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...
चौकट :
योगेश मराठे यांनी गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तळोदा शहराध्यक्ष म्हणून पक्ष संघटन मजबूत केले. राजकारणातील दीर्घ अनुभव आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे.
0 Response to "राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांचा राजीनामा, भाजपाशी संपर्क असल्याची चर्चा"
टिप्पणी पोस्ट करा