
आधार कार्ड अपडेटमुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखीगटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांना नोटीस
तळोदा : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे शिक्षकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. या कामी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिक्षकांचे नाकी नऊ आले असून गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांना नोटीस देवून काम पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, यंत्रणेच्या वेळ वाचावा, शिक्षक, विद्यार्थी, पालक प्रशासकीय यंत्रणा इत्यादी घटकांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, व एक विद्यार्थी एकच शाळेत प्रवेशित,बोगस व डूप्लिकेट प्रवेशांना आळा बसावा,यासाठी विद्यार्थी माहिती प्रणाली अर्थात सरल पोर्टल विकसित करण्यात आलेली आहे.संच मान्यतेसाठी देखील आधार कार्ड लिंक असणाऱ्या सरल पोर्टलवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येते.या सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी करत असताना विद्यार्थ्यांच्या स्टुडन्ट आयडी सोबत त्याचे आधार कार्ड संलग्न असणे अत्यावश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न करण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक मोहीम राबवली असून शाळांना १०० टक्के विद्यार्थ्यांचे आधार संलग्न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तथापि वारंवार सूचना देऊन देखील या कामात दुर्लक्ष केल्याप्रकरणी तळोदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदसह सर्वच व्यवस्थापनाच्या जवळपास तालुक्यातील सर्वच शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावल्या आहेत. सरल अंतर्गत स्टुडन्ट पोर्टलमधील विद्यार्थी अपडेट करण्याच्या कामासंदर्भात आपणास वारंवार सुचित करण्यात येऊन देखील आधार कार्ड अपडेट करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले असून ज्या शाळांचे विद्यार्थी आधारकार्ड अपडेट चे काम बाकी असेल त्यांनी तात्काळ काम संपवावे अन्यथा त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा या नोटीस मधून देण्यात आला आहे.
त्यामुळे तळोदा तालुक्यात सध्या शिक्षकांकडून आधार कार्ड अपडेटच्या कामाला प्राधान्य दिले जात असून अनेक आधार केंद्रावर शिक्षक विद्यार्थ्यांना आधार दुरुस्तीच्या कामासाठी आणले असल्याचे पाहायला मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर नोंदणी करत असताना त्यांच्या नावाच्या स्पेलिंग, जन्मतारीख, लिंग या माहिती मध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याने आधार वरील माहिती व शाळेच्या रेकॉर्डवरील माहिती यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. या तांत्रिक बाबीमुळे सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती स्वीकृत केली जात नाही. शिक्षण विभागाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून सर्व विद्यार्थ्यांचे आधार संलग्न करण्याची सक्ती केली आहे. आधार नोंदणी करताना झालेल्या चुकांमुळे आता विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी आता शाळांवर व शिक्षकांवर आली आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून देखील तांत्रिक अडचणींमुळे यात यश येताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
तळोदा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर झाले असून अनेक पालक आपल्या पाल्यांना सोबत घेऊन गेले आहेत.अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे देखील मोठे डोकेदुखी ठरत असून पालकाची संपर्क करून देखील पालक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचत नसल्याचे शिक्षकांचा अनुभव आहे.अनेक विद्यार्थ्यांचे दोन ते तीन वेळा आधार कार्ड दुरुस्ती करून देखील दुरुस्ती होत नसल्याचे देखिल दिसून आले आहे. अनेक शाळांमध्ये आधार कार्ड दुरुस्ती कॅम्प झाले असताना देखील हे संपत असून या सर्व प्रक्रियेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह शिक्षक व शालेय यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे..
0 Response to "आधार कार्ड अपडेटमुळे शिक्षकांची वाढली डोकेदुखीगटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांना नोटीस"
टिप्पणी पोस्ट करा