अखेर दिव्यांग बांधवांना मिळाले साहित्य : आम. खास. गावीतांच्या उपस्थितीत कार्यक्रम, प्रशासकीय अधिकारी मात्र गैरहजर
तळोदा : केंद्र सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि भारतीय कृत्रिम अंग निगमच्या (एलिम्को) वतीने दिव्यांगांना उपलब्ध झालेल्या साहित्याचे वाटप कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात 153 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तीना अडचणींवर मात करता यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहता येण्यासाठी शासनाकडून दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागाकडून विविध साहित्य वाटप केले जाते. सदर साहित्य वाटपाचा कार्यक्रम 22 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध लोकप्रतिनिधी देखिल उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमुळे लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे कार्यक्रमच रद्द करावा लागला होता. यामुळे दिव्यांग बांधवांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तळोदा तालुक्यात निवडणूक नसल्याने सदर कार्यक्रम घेण्यात यावा असा आग्रह काही लोकप्रतिनिधीनी घेतला होता तर काही लोकप्रतिनिधी कार्यक्रम आचारसंहितेत घेऊ नये अशी भूमिका घेतली. या सर्व प्रकारामुळे तळोदा पंचायत समितीच्या बीडिओ यांची चांगलीच गोची झाली होती. अखेर आज दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रम येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शनिवारी पार पडला..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजयकुमार गावित होते. मंचावर खासदार हिना गावित, सुप्रिया गावित, माजी जि.प सदस्य जितेंद्र पाडवी, जिप सदस्या संगीता प्रकाश वळवी, जि.प सदस्या पार्वती पाडवी, जि.प सदस्या सुनीता पवार,दिव्यांग आघाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, मगन वळवी, भरत पवार,आदी उपस्थित होते..
या कार्यक्रमात 153 दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले, त्यात 5 जणांना बॅटरीवर चालणारी साईयकल, 2 जणांना सादी सायकल, जणांना विल चेअर, 20 जणांना प्रत्येकी 2 श्रवण यंत्र, 6 जणांना तांत्रिक काठी, 16 जणांना व्हील चेअर,।मतीमनदाना एमआर किट, 12 लाभार्थ्यांना क्रत्रिम अवयव, 23 जणांना कुबडी काठी, 25 जणांना चष्मा, 20 जणांना छडी, 2 नग वाटप करण्यात आले.
दरम्यान, यावेळी बोलतांना खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या दिव्यांगांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना आहेत मात्र त्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने लाभार्थी लाभापासून वंचित राहतात उज्वला योजना संदर्भात देखील त्यांनी ज्यांनी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून उज्वला योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील त्या म्हणाल्या..
अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले की, दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम 4 दिवसांपूर्वीच आयोजित करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नसल्याने अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली व कार्यक्रमास दिरंगाई झाली. मोठ्या प्रयत्नांनी खा हिना गावित यांनी समाजकल्याण मंत्र्यांना सांगून साहित्य उपलब्ध करून दिले. अगोदरच कोरोनाच्या नावाखाली 8 महिने साहित्य मिळाले नव्हते, त्यात काही नेत्यांनी निवडणुका नंतर कार्यक्रम घ्या, असा दबाव अधिकाऱ्यांवर आणला. ते स्वतः काही करत नाही दुसऱ्यांना करू देत नाही असा टोला विरोधकांना लगावला. याबाबत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई चा इशारा देखील त्यांनी बोलताना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
आचारसंहितेमुळे सुरुवातीपासूनच वादात सापडलेला साहित्य वाटपाचा कार्यक्रम अखेरपर्यंत वादात सापडलेला दिसून आला शासकीय निधीतून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आले मात्र वाटप करताना एकही शासकीय अधिकारी कर्मचारी मंचावर व कार्यक्रम स्थळी दिसून आला नाही. शिवाय भाजपाचे काही ठराविक लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात उपस्थित लावण्या ऐवजी आदिवासी संस्कृती भावनांचा बाहेरच भटकंती करताना दिसून आले. त्यांच्या अश्या प्रकारे उपस्थितीवरून त्यांच्यावरील तणावाचा अंदाज येत होता....
0 Response to "अखेर दिव्यांग बांधवांना मिळाले साहित्य : आम. खास. गावीतांच्या उपस्थितीत कार्यक्रम, प्रशासकीय अधिकारी मात्र गैरहजर"
टिप्पणी पोस्ट करा