थेट नगराध्यक्ष भाजपच जिंकतो या समजुतीला तळोद्याचा छेद
तळोदा : नगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणाची पारंपरिक गणिते पूर्णपणे उलथवून टाकली आहेत. गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांचा इतिहास पाहता थेट नगराध्यक्ष पदावर भाजपचा वरचष्मा राहिला होता. १९७८ पासून २०१७ पर्यंत भाजप प्रणित उमेदवारांनीच थेट नगराध्यक्ष पद जिंकले होते. मात्र यंदा हा इतिहास मोडीत निघाला असून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह ११ नगरसेवक निवडून आणत धक्कादायक मुसंडी मारली आहे.
या विजयाचे केंद्रबिंदू ठरले ते योगेश चौधरी. भाजपकडून अपेक्षित उमेदवारी व स्थान न मिळाल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी भाग्यश्री चौधरी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. कोणताही बडा नेता, आमदार किंवा प्रभावी वक्ता पाठीशी नसताना श्रमजीवी पद्धतीने मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे हाच त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार ठरला. दोन वर्षांपासून सुरू असलेला प्रभागनिहाय जनसंपर्क, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांतील उपस्थिती, आरोग्य व आर्थिक मदतीची भूमिका याचा थेट फायदा मतपेटीत झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षण करणारा ठरला आहे. नगरसेवक पदाचे उमेदवार देताना प्रमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराशी सुसंगतता न राखणे ही मोठी चूक ठरली. याशिवाय निष्ठावंतांना उमेदवारी पासून डावलून नव्याना संधी देण्यात आली. उमेदवारी जाहीर करण्यात झालेला विलंब, काही प्रभागात लादलेली उमेदवारी आणि “भाजपचे चिन्ह म्हणजे विजय” हा अती आत्मविश्वास पक्षाला महागात पडला. प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी आणि स्पष्ट रणनीतीचा अभाव यामुळे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भाजपविरोधात गेलेली नाराजी यामागे तीन वर्षांचा प्रशासक काळ असल्याने हेही महत्त्वाचे कारण ठरले. लोकप्रतिनिधीकडे वारंवार समस्या मांडूनही मुख्याधिकारी स्तरावर दिसलेली ढिसाळ भूमिका, शहरातील वाढलेली धूळ, रखडलेली विकासकामे आणि एकूणच विकास ठप्प असल्याची भावना नागरिकांमध्ये खोलवर रुजली होती. हीच अस्वस्थता भाजपला मतपेटीत महागात पडली.
शिवसेनेने सूक्ष्म नियोजन केले असले तरी लढत भाजपविरोधातच आहे, या समजुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अचानक एन्ट्रीमुळे त्यांचे गणित बिघडले आणि हितेंद्र क्षत्रिय तिसऱ्या स्थानावर राहिले. तसेच आमदार राजेश पाडवी यांची ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने काही लोकांकडून मिळालेला चुकीचा किंवा अपूर्ण फीडबॅक देखील रणनीतीस मारक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला, हेही या निकालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. चार वेळा नगरसेवक राहिलेले संजय माळी यांच्या पत्नी अपर्णामाळी, माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगराध्यक्ष हेमलता डामरे, जिल्हा संघटन मंत्री कैलास चौधरी तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनुप उदासी यांच्या पत्नी सुनेना उदासी यांचा पराभव म्हणजे मतदारांनी स्पष्ट बदलाचा कौल दिल्याचे चित्र आहे.
एकूणच, तळोद्याचा निकाल हा पैसा, सत्ता आणि मोठ्या नेत्यांपेक्षा स्थानिक नेतृत्व, थेट संपर्क आणि योग्य वेळेचे राजकीय निर्णय किती निर्णायक ठरतात याचे जिवंत उदाहरण ठरला आहे. जन्मताचा कौल ओळखता येत नाही हेच या निवडणुकीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे...
*थेट नगराध्यक्ष भाजपच जिंकतो याला छेद*
तळोदा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचा कायम वरचष्मा राहिल्याचा इतिहास आहे. १९७८ मध्ये स्व. गुलाल बुलाखी माळी, २००१ मध्ये विमल काशिनाथ सोनवणे आणि २०१७ मध्ये अजय छबुलाल परदेशी हे भाजपकडून विजयी झाले होते. मात्र यंदा हा इतिहास मोडीत निघाला असून भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे...
0 Response to "थेट नगराध्यक्ष भाजपच जिंकतो या समजुतीला तळोद्याचा छेद"
टिप्पणी पोस्ट करा