जिल्हा कार्यकारणीतून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने संतापाची लाट
तळोदा : जिल्हा कार्यकारणीच्या नव्या यादीतून निष्ठावान व जुने कार्यकर्ते वगळल्याने पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणीत शिफारस पत्र देऊनही ही नावे यादीतून वगळण्यात आली. याशिवाय माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, भाजपाचे कट्टर समर्थक भगवान माळी यांच्यासह नुकतेच काँग्रेस मधून भाजप पक्षावर विश्वास ठेवून आलेला भरत माळी यांच्या एकाच कुटुंबातून त्यांच्यासह भाऊ व पुतणे असे 3 जणांना वगळल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे.
जिल्हा कार्यकारणीच्या यादीतून भरत माळी, जितेंद्र सूर्यवंशी, सुरेश गुलाल, भगवान माळी, संजय माळी, ईश्वर पाडवी, नारायण ठाकरे, अनिता कलाल आदी कार्यकर्त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. हे सर्व कार्यकर्ते केवळ निवडणुकीतच नव्हे तर वर्षभर पक्षासाठी विविध उपक्रमांत कार्यरत राहिले आहेत.
विशेषतः माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी प्रतोद संजय माळी व स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांना स्थान न मिळाल्याने भरत माळी गट नाराज आहे. काँग्रेसमधून आ. राजेश पाडवी यांच्या भूमिकेतून भाजपात दाखल झालेले भरत माळी तीन वेळा नगराध्यक्ष, जिल्हा बँक संचालक व विविध पदांवर कार्यरत राहिले असून तळोदा शहरात त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे
जितेंद्र सूर्यवंशी यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महत्वपूर्ण रणनीती आखून प्रचार मोहिमेचे नियोजन केले होते. गावोगावी प्रचार यंत्रणा उभी करण्यापासून ते कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यापर्यंत त्यांचा हातभार मोलाचा होता. विविध शिबिरांचे आयोजन आणि पक्षविस्तार मोहिमांमध्ये ते अग्रस्थानी राहिले. प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनातही त्यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.
सुरेश गुलाल भगवान माळी, हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षासोबत काम केले आहे. संजय माळी 4 वेळा नगरसेवक राहिले आहे. अनिता कलाल यांनी यापूर्वी भाजपकडून तालुका महिला अध्यक्षपद भूषवले होते. माजी नगरसेवक ईश्वर पाडवी, आमदारांचे जवळीक असलेले नारायण ठाकरे, हेही कार्यकर्ते संघटन व शिस्तीच्या बाबतीत ओळखले जातात. पक्षाच्या चांगल्या-वाईट काळात त्यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. त्यामुळे, त्यांना वगळण्याचा निर्णय हा मेहनती व निष्ठावान कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे मत तळागाळातील अनेकांनी व्यक्त केले आहे.
काही कार्यकर्त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत म्हटले, “आमचा वापर केवळ काम करून घेण्यासाठीच होतो. गरज संपली की आम्हाला विसरले जाते.” ही भावना आता कार्यकर्त्यांच्या वतीने सोशल मीडियावरूनही व्यक्त होत असून, समर्थकांनी याबाबत पोस्ट, व्हिडिओ आणि प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ही बाब केवळ जिल्हा पातळीपुरती मर्यादित राहणार नाही. प्रदेश पातळीवरही याचे पडसाद उमटू शकतात. अशा निर्णयांमुळे संघटनातील समर्पित कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होऊन पक्षाची भक्कम रचना डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आमदार राजेश पाडवी भरत माळी व जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून या विषयावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरी, कार्यकर्त्यांमध्ये याविषयी चर्चेची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रतिक्रिया -
भाजपकडून अद्याप कुणाला ही डावलण्यात आलेले नाही, काही जणांचे नावे स्वतः आमदार राजेश पाडवी यांची शिफारशी नुसार सादर करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ कार्यालयाने त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला असावा म्हणून त्यांना तूर्तास जबाबदारी पासून राखून ठेवले आहे. यात विशेषतः भरतभाई माळी यांच्या कुटुंबीयांचा सन्मान राखला जाईल याबाबत विश्वास आहे.
गौरव वाणी
शहर अध्यक्ष भाजप
प्रतिक्रिया
निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षातून आलेल्यांना कार्यकारणीत स्थान देणे ही अन्यायकारक बाब आहे. जेव्हा भाजपाला उमेदवार मिळत नव्हते, तेव्हा निष्ठावंतांनीच पक्षासाठी निवडणुका लढवल्या व विजय मिळवून दिला. मात्र आज परिस्थिती बदलली असून निष्ठावंतांची उपेक्षा होत आहे. कार्यकारणीत झालेल्या या बदलांना माझा ठाम विरोध आहे, कारण यामुळे निष्ठावंतांचा आत्मविश्वास कमी होईल आणि पक्षातील एकजूट धोक्यात येईल.
सुरेश गुलाल माळी
माजी उप नगराध्यक्ष
0 Response to "जिल्हा कार्यकारणीतून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने संतापाची लाट"
टिप्पणी पोस्ट करा