विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रकाशा येथे लसीकरण केंद्राला भेट
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.23: नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे लसीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ.नारायण बावा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मिलिंद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
श्री.गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतू ग्रामस्थांनी कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करावा. अधिकाऱ्यांनी लसीच्या उपलब्धतेनुसार सूक्ष्म नियोजन करावे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले, जिल्ह्याने लसीकरणाचा साडेतीन लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यासह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी जनजागृतीसाठी चांगले प्रयत्न केले. सोंगाड्या पार्टीसारख्या लोककलेच्या माध्यमातूनही जनजागृतीचे प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
0 Response to "विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रकाशा येथे लसीकरण केंद्राला भेट"
टिप्पणी पोस्ट करा