संपर्क करा

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा-राधाकृष्ण गमे

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा-राधाकृष्ण गमे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.23: कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात झालेल्या मृत्यूमागील कारणांचे विश्लेषण करण्यात यावे, त्यासाठी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांकडूनही माहिती घ्यावी. असे विश्लेषण पुढील काळात कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपारयुक्त अरविंद मोरे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.

श्री.गमे म्हणाले, मृत्यूच्या कारणांचे सूक्ष्म विश्लेषण करून त्याचा अहवाल तयार करावा. पुढील काळात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी असे विश्लेषण उपयुक्त ठरेल. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 आणि 48 तासात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये आढळलेल्या लक्षणांचेही विश्लेषण करण्यात यावे. सर्वेक्षणातील त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. 


आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवाशांची स्वॅब चाचणी करण्यात यावी. कोरोना बाधित आढळलेल्या भागात विशेषत्वाने लक्ष द्यावे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मोहीम स्तरावर गंभीर आजार असलेल्या मुलांची माहिती घ्यावी आणि अशा मुलांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांना द्याव्यात.

प्रस्तावित ऑक्सिजन प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. प्रकल्पाच्या ठिकाणी आपत्कालीन सुविधा तयार ठेवावी. कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. 18 वर्षावरील व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या पहिल्या 2 ग्रामपंचायतीना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरओ प्लॅन्ट उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केला असल्याचेही श्री.गमे म्हणाले.

*व्हॅक्सिन व्हॅनचे उद्घाटन* 
बैठकीपूर्वी श्री.गमे यांच्या हस्ते माझगाव डॉकतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या व्हॅक्सिन व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी व्हॅनची माहिती घेतली. या वाहनाचा उपयोग लसींच्या वाहतूकीसाठी करण्यात येणार असून वाहनात तापमान नियंत्रित ठेवण्याची सुविधा आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी नियोजन भवनाच्या इमारतीच्या बांधकामाची माहिती घेतली.

*विभागीय आयुक्तांची जिल्हा रुग्णालयाला भेट*
विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प, डायलिसिस वॉर्ड, नवजात अर्भक कक्षाला भेट दिली. त्यांनी म्युकर मायकोसिस कक्षास भेट देऊन रुग्णांवर होणाऱ्या उपचाराबाबत माहिती घेतली. कोरोना बाधित बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचीदेखील त्यांनी पाहणी केली. बालकांसाठी आवश्यक सर्व औषधे आणि सुविधा पुरेशा प्रमाणात तयार ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

श्री.गमे यांनी जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील  लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. कोरोना  लसीकरणासाठी वाढती गर्दी लक्षात घेता अतिरिक्त पथक नेमण्याचा सूचना त्यांनी दिल्या.  जिल्हा रुग्णालयातील किरकोळ दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाने त्वरित करावीत असे निर्देश त्यांनी दिले.आयुष रुग्णालय इमारतीच्या कामालाही वेग देण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.  यावेळी आरोग्य उपसंचालक पी.डी. गांडळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

रुग्णालय परिसरात विभागीय आयुक्त गमे, जिल्हाधिकारी डॉ.भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

0 Response to "कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा-राधाकृष्ण गमे"

टिप्पणी पोस्ट करा

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

UA-199888941-1

Advertise under the article