शहरातील रस्ते खोदकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले, नागरिकांमध्ये नाराजी
तळोदा : शहरात वाढत्या धुळीच्या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः हिवाळ्यात धुळीचा उत्सर्जन वाढत असल्याने अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली शहरातील सर्वच रस्ते खोदून काढल्यामुळे शहरात धुरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी नागरिकांची आरोग्याची स्थिती धोक्यात आली आहे.
शहरातील रस्ते आणि गल्ल्या धुळीने व्यापलेले आहेत. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करत आहेत. स्थानिक पालिका प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. विशेषतः दिवाळी सणाच्या व अस्तंबा ऋषी यात्रेत येणाऱ्या भविका समवेत फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना या धुळीमुळे त्रास होत आहे.
*आरोग्याच्या समस्या*
धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या समस्या, एलर्जी आणि दमा सारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक दवाखान्यातही धुळीच्या समस्येमुळे वाढलेल्या आजारांची संख्या लक्षात येत आहे. "धुळीमुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे," असे मत शहरवासी व्यक्त करत आहे. अनेकांनी धूळ कशी कमी करावी यासाठी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
*खोदकामामुळे रस्ते धुळमय*
शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या खोदकामांमुळे वाहनचालकांना वाहतुकीत अडथळे येत आहेत, आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय धुळीचे प्रमाण वाढले असून आजारपणांची शक्यता वाढली आहे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना त्रास होत आहे.
तळोदा शहरातील धुळीच्या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने नियमितपणे रस्ते धुऊन, कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनीही स्वच्छतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून तळोदा शहर पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुरक्षित बनवता येईल. या समस्येवर लवकरच उपाय योजना न केल्यास, तळोदा शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे...
प्रतिक्रिया :
"पाणी पुरवठा योजनेमुळे सुधारणा अपेक्षित होती, पण कामाची गती कमी असल्याने धुळीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्ते व्यवस्थित करावेत.
पंडित भामरे
स्थानिक नागरिक
"रोजच्या प्रवासात रस्ते खचलेले असल्याने वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे दृष्टी आड येते. हे काम जलदगतीने पूर्ण केले तर सर्वांसाठी सोईचे होईल.
वाहनचालक
उमेश पाडवी
"रस्ते खोदल्यामुळे दुकानात धूळ जमते, ज्यामुळे ग्राहकांची आवक कमी झाली आहे. व्यवसायावर याचा परिणाम होतोय; प्रशासनाने पावले उचलावीत.
दादाभाऊ पाटील
"धुळीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शाळेत जाणे कठीण झाले असून अनेक विद्यार्थी आजारी पडत आहेत.
"अशा प्रकारच्या धूळ प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार आणि ऍलर्जीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे."
डॉ.महेंद्र चव्हाण
0 Response to "शहरातील रस्ते खोदकामामुळे धुळीचे प्रमाण वाढले, नागरिकांमध्ये नाराजी"
टिप्पणी पोस्ट करा