आता शहादा-तळोदा मतदार संघाला हवे मंत्रिपद !दोन्ही तालुक्यात चर्चा ; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून पाडवींचे कौतुक ...
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार राजेश पाडवी यांनी आज दि २६ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. फडणवीस यांनी आ. पाडवी यांच्या विजयाबद्दल कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचा गड शाबूत राखणारे आ.पाडवी यांना आता मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा शहादा व तळोदा तालुक्यातून व्यक्त होत आहे. पुलोद सरकारात दिलवरसिंग पाडवी यांच्या रूपाने दुर्गम तालुक्याला राज्य वन मंत्रिपद दिले होते. त्यानंतर काँग्रेसने पदमाकर वळवी यांना मंत्रिपद दिले. मात्र गेल्या ११ वर्षांपासून हा दुर्गम भाग मंत्रिपदापासून वंचित आहे. आदिवासी बहुल लोकसंख्येच्या शहादा, तळोदा तालुक्यातील विकासाला यामुळे ब्रेकही लागला आहे. लोकसभेतील व त्यानंतरच्या निगेटिव्ह वातावरणातही राजेश पाडवी यांनी दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणत भाजपचा झेंडा फडकवला असल्याने पक्ष नेतृत्वाने दुर्गम तालुक्याच्या विकासासाठी कामाची दखल घेत त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
या भेटीत आमदार पाडवी यांनी फडणवीस यांच्यासोबत मतदार संघासह राज्यातील विविध विकासकामांची आणि आगामी योजनांबाबत चर्चा केली. भाजपचे मंत्री विजय चौधरी आणि प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी सोबत होते. चर्चेत शहादा-तळोदा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांवर विशेष भर दिला. त्या कामांसाठी सरकारकडून सहकार्याची मागणी आ.पाडवी यांनी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाडवी यांना अधिक सक्रियपणे मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे प्रोत्साहन दिले.
नेत्यांच्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?
याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. महामंत्री विजय चौधरी यांनी तळोदा येथील आनंद चौकातील सभेत राजेश पाडवी यांना मंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचक वक्तव्य केले होते. याशिवाय डॉ.शशिकांत वाणी यांचे देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क असल्याकारणाने या भेटीच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीमुळे राजेश पाडवी यांना मंत्रीपदाच्या वाटेवरील एक मोठा टप्पा गाठता येईल, अशी आशा कार्यकर्त्यांना लागून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेश पाडवी यांची भेटीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. यामुळे याभेटीला महत्व प्राप्त झाले आहे. नवीन मंत्री मंडळात आ.राजेश पाडवी यांना स्थान मिळेल का ? यासाठी आ.पाडवी व जिल्ह्यातील जेष्ठ नेते पुढाकार घेतील का? याबाबत चर्चा रंगली आहे.
0 Response to "आता शहादा-तळोदा मतदार संघाला हवे मंत्रिपद !दोन्ही तालुक्यात चर्चा ; उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून पाडवींचे कौतुक ..."
टिप्पणी पोस्ट करा